Wednesday, March 16, 2016

महाराष्ट्रातील अभयारण्ये


ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर-


ताडोबा येथील दाट जंगल १९५५ मध्ये संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात ते आहे. नागपूरपासून १५४ कि. मी. अंतरावर असलेल्या ताडोबाच्या जंगलात अगदी मध्यभागी ताडोरा नावाचा तलाव आहे. साग, मोह, निलगिरी अशी झाडे या सुमारे ११६ चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या जंगलात आहेत. तर वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे २५० प्रकारचे पक्षीही आढळतात. येथील ‘मगर पालन’ केंद्र हे आशिया खंडातील उल्लेखनीय केंद्र आहे. सुंदर झोपडीतील वन्यप्राणी संग्रहालय, तेथील प्राण्यांचे सांगाडे, पक्षांची घरटी हे सुद्धा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान व जोडूनच असलेले अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोन्ही प्रकल्पांना एकत्रितपणे ताडोबा-अंधारी व्याघ‘ प्रकल्प असे म्हटले जाते. स्थानिक आदिवासी देव तारू किंवा तारोबा यावरून ताडोबा हे नाव रूढ झाले, अन्‌ जंगलातून अंधारी नदी वाहते त्यावरून अभयारण्यास नाव देण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानास ‘विदर्भाचे रत्न’ असे म्हटले जाते.

संजय गांधी राष्ट्रिय उद्यान बोरीवली मुंबई-

मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरिवली येथील परिसरात - मुंबई व ठाणे शहरांसाठी जणू फुफुसांचे काम करणारे - हे राष्ट्रीय उद्यान / अभयारण्य आहे. या भागाला कृष्णगिरी उद्यान असेही म्हटले जाते. १९७४ मध्ये हे ‘अभयारण्य’ घोषित करण्यात आले. येथील दाट जंगलात कान्हेरी गुंफामध्ये बौद्ध लेणी कोरलेली आढळतात. जंगलची सफर घडवणारी रेल्वे येथे असून त्यातून आपण वनजीवनाचा आनंद घेऊ शकतो. सुमारे १०४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात चितळ, भेकर, सांबर हे प्राणी आढळतात, तसेच सुमारे २५० जातींचे पक्षीही येथे आढळतात. मुंबईपासून जवळ असल्यामुळे या अभयारण्यात पर्यटकांची कायम गर्दी असते.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया – 

२२ नोव्हेंबर, १९७५ या दिवशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले हे घनदाट जंगल महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे. नवेगाव तलावाभोवती लहान टेकड्यानी हे राष्ट्रीय उद्यान वेढलेले आहे. वाघ, बिबळ्या, सांबर, हरीण, चितळ, नीलगाय, अस्वल असे प्राणी येथील जंगलात दिसतात. तर पक्षीही भरपूर दिसतात. तलावामुळे पाण्याजवळ असणारे निरनिराळे पक्षी नेहमी येतात. येथील पक्षी अभयारण्यास डॉ. सलीम अली पक्षी अभरायण्य असे म्हटले जाते. राज्यातील एकूण पक्षांच्या प्रजातींपैकी सुमारे ६०% प्रजाती आपणास येथे पाहण्यास मिळू शकतात. हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात असून सुमारे १४० चौ. कि. मी. परिसरात पसरलेले आहे. खुद्द नवेगाव बांध हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव असून त्याचे क्षेत्र सुमारे ११ चौ. कि. मी. आहे. या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे ‘मालडोंगरी’ बेट आहे.

नागझिरा अभयारण्य ,गोंदिया– 

१९७०-७१ मध्ये घोषित केलेले हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्याच्या परिसरात आहे. मोठे वृक्ष, वेली, वनौषधी या जंगलात सापडतात. वाघ, लांडगा, रानमांजर, उदमांजर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, बिबळ्या, चिंकारा, रानकुत्रे तरस असे एकूण ३५ प्रजातींचे प्राणी या जंगलात आहेत. तसेच येथे सरपटणारे प्राणी (३४ प्रजाती) आणि विविध पक्षीही (१६६ प्रजाती) आढळतात. साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई. खैर, आंबा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर, कुसुंब असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर्व वृक्ष या जंगलात बघायला मिळतात. पर्यावरणविषयक जागृती करणारे वस्तु संग्रहालय देखील येथे पाहण्यास मिळते. तसेच वन्यजीवांचे अवशेष व संबंधित माहिती पटही आपण येथे पाहू शकतो. विदर्भातील हे एक लक्षणीय पर्यटन स्थळ असून याच जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथून जवळच आहे.
यावल अभयारण्य, जळगाव-
मार्च, १९६९ मध्ये हे संरक्षित जंगल म्हणून घोषित झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल रावेरजवळचे हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे. दाट वाढलेले बांबू, तसेच ऐन, बेल, बाभूळ, आवळा, जांभूळ, साग, तिवस, खैर, चारोळी, जांभूळ, तेंदू, धावडा, शिसम, पळस अशी वनसंपदा या जंगलात आहे. वाघ, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, शेकरू, सांबर, नीलगाय, रानमांजर, हरीण व मोर हे प्राणी-पक्षी येथे आढळतात. सातपुड्याची उत्तरेकडील रांग व अनेर नदीचे खोरे - यांच्या परिसरात हे जंगल पसरलेले आहे. सुखी किंवा सुकी नावाची नदीही या अभयारण्यातून वाहते. या परिसरात तडवी व पावरा जमातीचे अदिवासी राहतात. यावल तालुक्यातील या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे १७७ चौ. कि. मी. आहे. येथून जवळच पाल हे सातपुड्याच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे.
राधानगरी अभयारण्य, कोल्हापूर-

डिसेंबर, १९५८ मध्ये जंगली जनावरांची हत्या थांबावी या दृष्टीने हे राधानगरीचे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्र राज्यातील अगदी सुरुवातीच्या काळात घोषित झालेले हे अभयारण्य आहे. राजर्षी शाहू सागर, लक्ष्मी सागर हे मोठे जलाशय, पश्चिम घाटातील सह्याद्रीची रांग यांच्या सान्निध्यात असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातूनच वाहतात. नंतर कृष्णेला हे सर्व प्रवाह मिळतात. अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा,
पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा असे वृक्ष या जंगलात आहेत. बिबळ्या, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, मोठी खार, जंगली कुत्रे, हरीण असे प्राणी बघायला या जंगलात जंगलप्रेमी गर्दी करतात. हे अभयारण्य खास गव्यांसाठी संरक्षित व प्रसिद्ध आहे. कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरुडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. भोगावती नदीवरील राधानगरी धरणाच्या परिसरातील या जंगलास दाजीपूर अभयारण्य असे म्हटले जाते. कोल्हापूरपासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५१ चौ. कि.मी. आहे.

फोटो छायांकन- इंटरनेट 

सादरकर्ता -विकास अशोक दौंड
एम.जे. एमसी. प्रथम वर्ष
के.टी.एच.एम.कॉलेज


No comments:

Post a Comment